भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक, फलंदाज रिषभ पंत शुक्रवारी पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारच्या चिंधड्या उडून कार जळून खाक झाली होती. मात्र या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र प्रवासादरम्यान आणि अखेरच्या क्षणी समजूतदारपणा दाखवला नसता तर रिषभ पंतचे प्राण वाचणे कठीण होते.
एवढ्या भीषण अपघातानंतरही रिषभ पंतचे प्राण वाचण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. अपघाताची भीषणता पाहता रिषभ पंतने कार चालवताना सिट बेल्ट लावली असण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण त्याने सिट बेल्ट लावली नसती तर त्याचे प्राण वाचणे कठीण होते. तसेच दुसरी बाब म्हणजे अपघात होताच रिषभ पंत कारची काच तोडून बाहेर आला. जर तो बाहेर आला नसता तर तो कारमध्येच होरपळून गेला असता.
दरम्यान, या भीषण अपघातात रिषभ पंत ज्याप्रकारे वाचला त्याबाबत ट्रान्सपोर्ट तज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करत आहेत. ट्रान्सपोर्ट तज्ज्ञ नितीन दौस्सा यांनी सांगितले की, रिषभ पंतचं वाचणं हा एक चमत्कार आहे. त्याला कार चालवताना झोप आली असावी. कारण त्याने योग्य प्रकारे आराम केला नसेल. मर्सिडीजमधील सिक्युरिटी फिचर्समुळे पंतचे प्राण वाचले. अशा गाडीमध्ये स्पेशल सिक्युरिटी फिचर्स असतात. अपघात झाला तेव्हा रिषभ पंत मर्सिडिज बेंझ जीएलसी काल चालवत होता.