भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत एका भयंकर अपघातातून बालंबाल बचावला आहे. मात्र या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंतच्या कारला हा अपघात रुडकीजवळ मोहम्मदपूर जाट एरियाजवळ झाला. या अपघातावेळी एक बस ड्रायव्हर रिषभ पंतसाठी देवदुताप्रमाणे धावून आला. त्याने आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवत आपली बस थांबवली. त्यानंतर रिषभ पंतला पेटत्या कारपासून दूर नेले. तसेच त्याला चादरीत लपेटून रुग्णालयात दाखल केले. हा बस ड्रायव्हर मदतीसाठी आला तेव्हा रिषभ पंतने त्याला आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बस ड्रायव्हर त्याला ओळखतच नव्हता. मात्र तरीही त्याने माणुसकीच्या दृष्टीने रिषभ पंतला मदत केली.
या बस ड्रायव्हरचं नाव आहे सुशील कुमार. ज्यावेळी रिषभ पंतच्या कारला अपघात झाला. तेव्हा हरयाणा परिवहनची गाडी मागून येत होती. चालक सुशील कुमारने कारला झालेला अपघात पाहून बस थांबवली. त्यानंतर ११२ नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानंतर पंतला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.
आता या अपघातानंतरचा थरारक अनुभव या बस ड्रायव्हरने कथन केला आहे. सुशील कुमारने सांगितले की, मी हरयाणा रोडवेजमध्ये ड्रायव्हर आहे. मी हरिद्वार येथून बस घेऊन येत होतो. आम्ही नारसनजवळ पोहोचलो असताना समोरून एक कार आणि सुमारे ६० ते ७० च्या वेगाने डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर ही कार हरिद्वारकडच्या लाईनवर आली. मला वाटले आता ती बसवरही आदळेल. कुणालाही वाचवता येणार नाही. आमच्या जेमतेम ५० मीटरचं अंतर होतं. मी त्वरित सर्व्हिस लाईनवरून हटून गाडी फर्स्ट लाईनवर आणली. दरम्यान, ती गाडी सेकंड लाईनमध्ये गेली. माझी गाडी ५०-६० च्या वेगात होती. मी त्वरित ब्रेक लावून गाडी थांबवली आणि खिडकीतून बाहेर उडी मारली.
मी तिथे एका तरुणाला पाहिलं. तो जमिनीवर पडला होता. मला वाटलं तो वाचणारच नाही. कारमधून ठिणग्या निघत होत्या. त्या कारजवळच तो पडला होता. आम्ही त्याला उचललं आणि कारपासून दूर नेलं. मी त्याला विचारलं की, कारमध्ये आणखी कुणी आहे का, तर त्याने मी एकटाच असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानेच मी रिषभ पंत असल्याचं सांगितलं. मी क्रिकेटबाबत फार काही जाणत नाही. त्याला बाजूला उभं केलं. त्याच्या शरीरावर कपडे नव्हते. त्यामुळे आम्ही त्याला चादरीत लपेटून रुग्णालयात नेले.