भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक, फलंदाज रिषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार रुडकीमधील नारसन बॉर्डरजवळ हम्मदपूर झालजवळ रेलिंगवर आदळली. या अपघातानंतर कारला आग लागली. या अपघातात रिषभ पंतला गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, भारतीय संघातील माजी क्रिकेटपटूने रिषभ पंतची प्रकृती आणि त्याला झालेल्या दुखापतींबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार रिषभ पंतच्या कारला पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत पंतला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. रिषभ पंतच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये लक्ष्मण म्हणाले की, रिषभ पंतसाठी प्रार्थना करा. सुदैवाने तो आता धोक्याबाहेर आहे. रिषभ पंतच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. लवकरात लवकर बरा हो चॅम्प, असं ट्विट व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी केलं आहे.
दरम्यान, रिषभ पंत आधीच गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत होता. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले आहे. रिषभ पंतला एनसीएमध्ये थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता अपघातामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द संकटात सापडली आहे. त्याला झालेल्या जखमा पाहता रिषभ पंतला पुढचे काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
रिषभ पंतने २०२२ मध्ये खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांमध्ये ६१.८१ च्या सरासरीने ६८० धावा कुटल्या होत्या. तो कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. हल्लीच बांगलादेश दौऱ्यावरही त्याने दोन मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. पंतने यावर्षी खेळलेल्या १२ वनडेमध्ये ३७.३३ च्या सरासरीने ३३६ धावा काढल्या होत्या. तर २५ सामने खेळताना २१.४१ च्या सरासरीने ३६४ धावा केल्या होत्या.