भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी काल शुक्रवारची सकाळ वाईट बातमी घेऊन आली. टीम इंडियाचा धाकड फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आईला सरप्राईज देण्यासाठी रिषभ रातोरात दिल्लीवरून एकटाच निघाला होता. वाटेत ही दुर्घटना घडली.
रिषभ पंतच्या जीवाला धोका नसून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर आहे. या दुखापतींमुळे पुढील काही वेळा पंतला मैदानात उतरता येणार नाही.
रिषभ पंतला उपचारासाठी दिल्लीत आणणार? DDCA ने एअरलिफ्टबाबत दिली 'ही' माहिती
रिषभ पंत नुकताच बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिका खेळला. पंत मालिकेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला भेटण्यासाठी दुबईला पोहोचला. तेथून परतल्यानंतर त्याला कुटुंबाकडे जायचे होते. मात्र, वाटेत त्याचा अपघात झाला. पंतच्या दुखापत पाहिल्यानंतर तो जवळपास तीन ते सहा महिने क्रिकेटपासून दूर असेल असे मानले जात आहे.
पंतच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया गंभीर आहे. पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले की, पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला जीवघेणी दुखापत झालेली नाही. तो त्याच्या आईसोबत आहे. लिगामेंटच्या दुखापतीमुळे पंतच्या अडचणी वाढतील. 'पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतील. ही दुखापत अधिक गंभीर असेल, तर त्याला आणखी वेळ लागू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितले.
पंतला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे, आता पंतचे सर्व प्लॅन्स फ्लॉप होताना दिसत आहेत. पंत जर तीन महिने मैदानाबाहेर राहिला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेशिवाय तो आयपीएलमधूनही बाहेर राहू शकतो. पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.