मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात खेळणार नसल्याचे महेंद्रसिंग धोनीने निवड समितीला कळवले आहे. त्यामुळे या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात धोनी आपल्याला दिसणार नाही. धोनी संघात नसल्यामुळे आता रिषभ पंत ही निवड समितीची पहिली चॉइस असेल. पण वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पंतबरोबर आणखी एका यष्टीरक्षकाला संधी देण्यात येणार असल्याचे कळते. हा यष्टीरक्षक नेमका असेल तरी कोण, याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.
महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. या कालावधीत निमलष्करी जवानांसोबत 'ऑन फिल्ड' काम करायचं त्यानं पक्कं केलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीनं निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे.
धोनी नसल्यामुळे आता संघात रिषभ पंतची वर्णी लागणार, हे साऱ्यांनाच माहिती असेल. पण जर राखीव यष्टीरक्षक ठेवायचा असेल तर तो कोण असेल, या जागी कोणाला संधी देता येऊ शकेल, यावर चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला बऱ्याच यष्टीरक्षकांची नावं पुढे येत आहेत. पण सर्वात जास्त संधी इशान किशनला मिळू शकते, असे म्हटले जात आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने निवड समिती यावेळी निर्णय घेताना दिसू शकते. त्यामुळे पुढील चार वर्षांचा विचार केला, तर किशन हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. याबाबतचे वृत्त 'जागरण' या संकेतस्थळाने प्रकाशित केले आहे.
'कॅप्टन कूल' हे बिरूद जगात मिरवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वोत्कृष्ट 'फिनिशर' म्हणून लौकिक असलेला धोनी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या डावाला 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरला. त्याच्या संथ खेळीवर बरीच टीका-टिप्पणीही झाली-होतेय. त्यामुळेच धोनीच्या निरोपाची वेळ जवळ आल्याचं बोललं जातंय. बीसीसीआयनं तशा हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, धोनीनं एक मोठा निर्णय बीसीसीआयला कळवलाय. हे निवृत्तीच्या दिशेनं त्यानं टाकलेलं पहिलं पाऊल तर नाही ना, अशी कुजबुज क्रिकेटवर्तुळात सुरू झालीय.
धोनी निवृत्त होत नाहीए. निमलष्करी रेजिमेंटला दोन महिने वेळ देण्याचं त्यानं आधीच सांगितलं होतं. त्यासाठी तो ब्रेक घेतोय', असं बीसीसीआय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय. परंतु, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लष्करी जवानांसोबत काम करायची इच्छा धोनीनं आधीच बोलून दाखवली आहे. टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये तो मानद लेफ्टनंट कर्नल आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये या रेजिमेंटचं काम जवळून पाहायचा धोनीचा विचार आहे. त्याच दृष्टीने विंडीज दौऱ्यातून माघार घ्यायचं त्यानं ठरवलंय. म्हणजेच, क्रिकेटनंतर जे करायचंय त्या कामाचा प्रत्यक्ष अनुभवच धोनी दोन महिन्यांत घेणार आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच, या अनुभवानंतर तो क्रिकेट करिअरबाबत ठोस निर्णय घेऊ शकतो.