मुंबई - गेल्या महिन्याच्या अखेरीस भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत हा घरी जात असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, या अपघातानंतर काही स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत पंतला अपघातग्रस्त कारपासून दूर नेले होते. तसेच त्याला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली होती. दरम्यान, सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या रिषभ पंतने त्यापैकी दोन तरुणांची भेट घेतली. या तरुणांची भेट घेतल्यानंतर रिषभ पंतने भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये रिषभ पंत म्हणाला की, मी प्रत्येकाचे वैयक्तिकरीत्या आभार मानू शकत नाही. मात्र या दोन हीरोंचा मी ऋणी आहे. त्यांनी माझा अपघात झाल्यानंतर मला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याची व्यवस्थआ केली. रजत कुमार आणि निशू कुमार तुमचे आभार. मी तुमचा आजन्म ऋणी राहीन, असे उदगार रिषभ पंतने काढले आहेत.
दरम्यान, अपघातानंतर रिषभ पंतने आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले होते. तसेच प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली होती. २५ वर्षीय खेळाडूने ट्विटरवर लिहिले की,''सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. रिकव्हरीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय आणि जय शाह व सरकारी यंत्रणांचे आभार.