नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची उत्तराखंडच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील तरुणांमध्ये खेळाप्रती आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी ही घोषणा केली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवर पंतशी बोलतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. "भारतातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक, युवकांचे आदर्श आणि उत्तराखंडचा लाल ऋषभ पंतला, राज्यातील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त करण्यात आले आहे,"असे ते म्हणाले.
धामी व्हिडिओमध्ये पंतशी संवाद साधताना दिसत आहे. त्याचवेळी त्यांनी पंतांला उत्तराखंडमध्ये येण्याचे निमंत्रणही दिले. या सन्मानाबद्दल पंतनेही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि लोकांना खेळ आणि फिटनेससाठी प्रेरित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पंतनेही ट्विटरवरुन ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याची संधी दिल्याबद्दल पुष्कर धामींचे आभार मानले. मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि मला आनंद आहे की तुम्ही फिट इंडियासाठी ही पावले उचलत आहात, असे पंत म्हणाला. पंत सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तिथे तो तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत आहे.