Join us  

Rishabh Pant Captaincy: "रिषभ पंतची कप्तानी अत्यंत वाईट; फलंदाजीतही दिसतो अहंकार"; टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली साखळी फेरीतच बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 3:20 PM

Open in App

Rishabh Pant Captaincy: IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. शेवटच्या सामन्यात विजय न मिळाल्याने दिल्लीचा संघ साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर गेला. मुंबईने दिल्लीला पराभूत केल्याने RCB ने प्लेऑफ फेरी गाठली आणि दिल्लीवर पराभवाची नामुष्की ओढवली. अशा परिस्थितीत, दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत याच्यावर टीका झाली नाही तरच नवल. काही दिवसांपूर्वी विरेंद्र सेहवागने पंतवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता आणखी एका भारतीय माजी क्रिकेटपटूने रिषभ पंतवर टीकास्त्र सोडलं आहे.

"रिषभ पंत हा खेळाडू म्हणून माझा फेव्हरेट आहे. आम्ही एकाच क्लबकडून खेळलो आहोत. पण त्याची नेतृत्वशैली अजिबातच चांगली नाही. यंदाच्या हंगामात कर्णधार म्हणून त्याने घेतलेल्या अनेक निर्णयांनी मला डोकं खाजवायला भाग पाडलं. एका सामन्यात कुलदीप यादवने ३ षटकात ४ बळी घेतले होते, पण त्या सामन्यात पंतने कुलदीपला चौथे षटक टाकूच दिले नाही. इतकंच नव्हे तर अनेक वेळा दिल्लीच्या संघातील प्रमुख गोलंदाजांचा चार षटकांचा कोटा पूर्ण झालाच नाही", अशा शब्दांत रिषभ पंतवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली.

"रिषभ पंत कर्णधार म्हणून नापास झालाच. पण त्यासोबत एक फलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी सुमार दर्जाची असल्याचे दिसून आले. त्याची फलंदाजी दिल्लीसाठी डोकेदुखीच ठरल्याचे दिसून आले. सामने जिंकण्यासाठी त्याच्या धावांचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. ज्या सामन्यांत त्याची फलंदाजी चांगली झाली त्यात संघाला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे पंत संघाला विजय मिळवून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. रिषभ पंत अनेक वेळा आपल्या अहंकारामुळे बाद झाला. गोलंदाज कसा आहे याचा विचार न करता केवळ मोठे फटके मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. दिल्लीच्या फलंदाजी क्रमवारीमध्ये रिषभ पंत नंतर फारशी फलंदाजी नव्हती. ही गोष्ट माहिती असूनही तो बेजबाबदारपणे फटके खेळायचा, ते योग्य नव्हते", असं म्हणत त्याने पंतवरील नाराजी सांगितली.

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्स
Open in App