भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी दिली. दरम्यान, या अपघातानंतर पंतचं वक्तव्य समोर आलं आहे. हा अपघात कसा झाला आणि त्यातून तो कसा वचावला याची माहिती त्यानं दिली. जर पंत कारमधून बाहेर पडू शकला नसता आणि उशिर झाला असता तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. अपघातानंतर कारमध्ये मोठी आग लागली होती.
आपण स्वत:च कार चालवत होतो. कार चालवत असताना अचानक डुलकी लागली. याचमुळे कार डिव्हायडरवर आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर आपण विंड स्क्रीन तोडून बाहेर आलो, असं रिषभ पंतनं सांगितलं.