India vs South Africa 1st test: भारतीय संघाचा सध्या दक्षिण आफ्रिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने मालिकेची सुरूवात चांगली केली. पहिल्या डावाअंती भारताने १३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी खराब झाली पण तरीही टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या वेळी ऋषभ पंतने एक विक्रम केला. यष्टीरक्षक म्हणून त्याने १०० बळींचा टप्पा पार केला. यात ९२ झेल आणि ८ स्टंपिंगचा समावेश आहे. पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद १०० बळींचा टप्पा पार करणारा भारतीय ठरला. त्याने धोनीचा विक्रम मोडला. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत होतं. पंत हा उत्तराखंडचा ब्रँड अँम्बेसे़डॉर आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एक ट्विट केलं. पण त्यात चूक असल्याने त्यांनी ट्वीट डिलीट करत पुन्हा नवे ट्वीट केले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आधी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "खेळूया आणि जिंकूया... दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत उत्तराखंडचा सुपुत्र आणि राज्याचा ब्रँड अँम्बेसेडॉर असलेला ऋषभ पंत याने अप्रितम कामगिरी करत सर्वात जलद शंभरी बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याचे अभिनंदन!" मात्र, ऋषभ पंत हा गोलंदाज नसल्याने त्याने बळी घेतले असा शब्दप्रयोग करणं योग्य नव्हतं. ही चूक त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.
डिलीट केलेलं ट्वीट
पुष्कर सिंग धामी यांनी त्यानंतर पुन्हा दुसरे ट्वीट केले. त्यात त्यांनी चूक सुधारली. "माझ्या क्रिकेटप्रेमींनो, भारताचा प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये यष्ट्यांमागे सर्वात जलद शंभर बळींचा टप्पा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरला. ही त्याला शुभेच्छा देण्याची वेळ आहे", असं ट्वीट त्यांनी केलं.