गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाने रिषभ पंतला भरपूर संधी दिल्या. पण या संधींचे सोने मात्र पंतला करता आलेले नाही. कारण संधी मिळूनही त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. तो बऱ्याचदा मैदानात फेल झालेला पाहायला मिळाला. अगदी रविवारी झालेल्या सामन्यातही पंतकडून झेल सुटला. पण तरीही कर्णधार विराट कोहलीचे त्याच्यावरचे प्रेम काही कमी होताना दिसत नाही.
पंत हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नक्कल करण्यातच मैदानात मश्गुल असतो, असे काही जणांनी यापूर्वीही म्हटले आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही पंतला आतापर्यंत आपली छाप पाडता आलेली नाही. पंतसाठी पर्याय म्हणून बरेच युवा यष्टीरक्षक पॅड बांधून तयार असले तरी सातत्याने नापास होऊनही त्यालाच संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
वेस्ट इंडिजबरोबरच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यातही तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात पंतने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर झेल सोडला. त्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांनी पंतला धोनीच्या नावाने चिडवायला सुरुवात केली. पण त्यानंतर सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीने पंतला का चिडवता, असा सवाल विचारत त्याची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले.