डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेला रिषभ पंत ( Rishabh Pant) पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसनासाठी गेला आहे आणि त्याच्या प्रकृतीत उल्लेखनीय सुधारणा होताना दिसत आहे. रिषभने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रिकव्हरीबाबत काही पोस्ट केल्या होत्या. आता रिषभ NCA मध्ये 140 kmph पेक्षा जास्त वेगाने येणाऱ्या चेंडूंचा नेटमध्ये सामना करू लागल्याचे वृत्त समोर येत आहे. रिषभ पंतने गेल्या महिन्यात थ्रोडाऊन घेण्यास सुरुवात केली होती, परंतु मागील काही आठवड्यांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा वेग वाढला आहे.
विशेष म्हणजे, रिषभला पंतला जलद फटकेबाजी करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि लहान हालचालीही तो सहज कतोय. त्याने कमी हालचालींसह विकेट्स राखण्यासही सुरुवात केली आहे. २५ वर्षांच्या रिषभसाठी शरीराची मोठी आणि जलद हालचाल करणे अद्याप दूरचे कार्य आहे, तरीही वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशिक्षकांना खात्री आहे की तो पुढील काही महिन्यांत ते साध्य करेल. रिषभने त्याच्या लक्षवेधी रिकव्हरीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.
“रिषभची तब्येत चांगली आहे. त्याने १४० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने येणाऱ्या चेंडूवर फलंदाजी करणे सुरू केले आहे. तो ज्या प्रकारे त्याच्या पुनर्प्राप्तीमधील प्रत्येक अडथळे पार करत आहे, त्याबद्दल आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. त्याचे पुढील लक्ष्य शरीराच्या जलद हालचालींवर लक्ष केंद्रित करणे असेल, जे पुढील काही महिन्यांत साध्य करण्याचे आमचे लक्ष्य आहे, ”असे एनसीएच्या एका सूत्राने रेवस्पोर्ट्झला सांगितले.
BCCIने सांगितले होते की, रिषभ पंतच्या कपाळावर जखमा झाल्या आहेत. उजव्या गुडघ्यावरील अस्थिबंधन फाटले गेले आहे. तसेच उजव्या हाताचे मनगट, घोटा आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीवर जखमा होत्या.
दरम्यान, सर्वांच्या नजरा केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या रिकव्हरीवर आहेत. दोन्ही खेळाडूंनी नेट्समध्ये फलंदाजी सुरू केली आहे. हे दोघेही अद्याप १०० टक्के तंदुरुस्त नसले तरी ते पूर्ण तंदुरुस्तीच्या जवळ आहेत आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ते भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी लोकेश राहुल फिट झाल्याचे वृत्त समोर येत आहे, परंतु श्रेयसबद्दप अद्याप तसा दावा करता येत नाही.