T20 विश्वचषक २०२१ पासून आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघात अनेक बदल झाले आहेत. विराट कोहलीनं आधी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडलं, त्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यानं कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडले. रोहित शर्माला प्रथम टीम इंडियाचा टी-२० कर्णधार बनवण्यात आले, त्यानंतर एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देण्यात आले आणि त्यानंतर हिटमॅन तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनला.
याची सुरुवात जेव्हा सौरव गांगुलीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (BCCI) अध्यक्षपद होतं, त्यानंतर रॉजर बिन्नी BCCI प्रमुख बनले. त्याचवेळी रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही याच काळात संपला आणि याच काळात राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. या सर्व बदलांमध्ये आता रोहितनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
विराट आणि रोहित हे जवळपास सारख्याच वयाचे खेळाडू आहेत आणि जर आपण दीर्घकाळात कर्णधारपदाबद्दल बोललो, तर भारतीय संघानं केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना आजमावलं आहे. बुमराह आणि पंत दुखापतींमुळे क्रिकेटमधून सध्या बाहेर आहेत आणि केएल राहुलच्या फॉर्ममुळे त्याच्याकडून कसोटी उपकर्णधारपदही हिरावलं गेलंय. आता अशा परिस्थितीत आगामी काळात टीम इंडियाची कमान फक्त हार्दिकच सांभाळू शकेल, असा विश्वास गांगुलीनं व्यक्त केला आहे.
काय म्हणाला गांगुली?“आयपीएल हे शिकण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे आणि आम्ही त्या ठिकाणी हार्दिक पांड्याचं नेतृत्व पाहिलं आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स चॅम्पियन बनला, त्यानं कॅप्टनसी कशी केली हे सर्वांनी पाहिलं आणि त्यामुळेच त्याला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आयपीएलमधील विजय-पराजयाकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे कारण ही एक मोठी स्पर्धा आहे,” असं गांगुली टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
पांड्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावं, अशी गांगुलीचीही इच्छा आहे. पांड्या सध्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे. याबद्दल त्याला सवाल करण्यात आला होता. याबाबत आपण घाई करणार नाही, जेव्हा पूर्णपणे तंदुरुस्त होऊ तेव्हाच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू असं हार्दिकनं म्हटलं होतं.