IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ७ मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रिषभला पुन्हा एकदा वेळेत षटकं पूर्ण करता आलेली नाही. ही त्याची तिसरी चूक असल्याने त्याच्यावर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय त्याला ३० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि उर्वरित दोन सामने जिंकून त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत टीकता येणार आहे. पण, आता रिषभच्या गैरहजेरीत १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध DC ला खेळावे लागेल.
आयपीएलच्या आचारसंहिते अंतर्गत हा त्याच्या संघाचा सीझनमधील तिसरा गुन्हा होता, ज्यामुळे रिषभ पंतला ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित सदस्यांना प्रत्येकी १२ लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के, यापैकी जे कमी असेल दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम ८ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. यानंतर, अपील पुनरावलोकनासाठी BCCI लोकपालकडे पाठवण्यात आले. लोकपालने व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील याची पुष्टी केली.
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा अन् वादग्रस्त ठरला. कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) याने २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RR ला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. पण, १६ व्या षटकात त्याची विकेट पडली अन् मॅच फिरली. त्याच्या विकेटने वाद निर्माण झाला आहे. १८व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामना पूर्ण फिरवला. त्यानंतर RR ला पुनरागमन करणे अवघड झाले. RR ला ८ बाद २०१ धावा करता आल्या आणि दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला.