भारतीय संघाचा आघाडीचा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत गतवर्षी झालेल्या कार अपघातात बालंबाल बचावला होता. मात्र या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तो मैदानाबाहेर आहे. गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतच्या गुडघ्यावर शस्रक्रिया झाली असून, सध्या तो या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीतून पूर्णपणे बरे होईपर्यंत पंतला भारतीय संघाबाहेर राहावे लागणार आहे. सध्या रिषभ पंत बंगळुरू येथील एनसीएमध्ये तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे. आता २०२४ मध्ये होणाऱ्या आयपीएलपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन तो मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे.
दलीप ट्रॉफीचे उपांत्य फेरीचे सामने हे बंगळुरू येथे खेळले गेले. यादरम्यान, रिषभ पंत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला होता. यादरम्यान, तो कर्णधार हार्दिक पांड्यासोबत मस्ती करताना दिसला. भारतीय संघ सध्ये वेस्ट इंडिजमध्ये असून, तिथे १२ जुलैपासून भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. पांड्या भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र तो वनडे आणि टी-२० मालिकेमध्ये खेळणार आहे.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रिषभ पंतच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र त्याला यष्टीरक्षण करण्यासाठी फिट होण्यासाठी ३ ते ६ महिने लागू शकता. सध्यातरी त्याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. वय पाहता रिषभ पंतकडे अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी खूप घाई केली जाणार नाही. रिषभ पंत आक्रमक फलंदाज असला तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. पंतच्या अनुपस्थितीत के.एस. भरतला खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्याला आपला प्रभाव पाडला आलेला नाही.