मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरस्कारांवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाच दबदबा राहिला. वन डे व कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीबरोबर कोहलीला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय वन डे आणि कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही त्याने पटकावला. भारताच्या जसप्रीत बुमरानेही उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या वन डे व कसोटी संघात स्थान पटकावले. यामध्ये यष्टिरक्षक रिषभ पंत पुन्हा चर्चेत आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बेबी सीटर म्हणून नवं टोपण नाव मिळालेल्या रिषभ पंतलाआयसीसीने 2018 मधील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला.
2018 मध्येच कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या पंतने इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली. इंग्लंडमध्ये शतक करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. याशिवाय अॅडलेड कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 झेल टिपले. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. आयसीसी कसोटी क्रमवारीत पंतने 21व्या स्थानावर झेप घेतली. पंतने 2018च्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दोन शतकांसह जवळपास 700 धावा केल्या आहेत. आयसीसी क्रमवारीत पंतच्या खात्यात 673 गुण जमा झाले आहेत आणि त्याने महेंद्रसिंग धोनी व फारूख इंजीनियर यांनाही गुणांच्या बाबतित मागे टाकले आहे. धोनीने कारकिर्दीत सर्वोत्तम 662, तर इंजीनियर यांनी 619 गुणांची कमाई केली होती.