IND vs ENG 3rd ODI : रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि इंग्लंड हे कनेक्शन काही निराळंच आहे... इंग्लंडमध्येच रिषभने कसोटी शतक झळकावले होते आणि आज वन डेतील पहिले शतक झळकावून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. २६० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताचे आघाडीचे चार फलंदाज ७२ धावांत माघारी परतले होते. आता टीम इंडिया काही जिंकत नाही, असा आत्मविश्वात इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये व प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला. पण, रिषभ व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी शड्डू ठोकला अन् इंग्लंडच्या चेहऱ्याचा रंग हळुहळू उडताना जगाने पाहिला. हातचा सामना निसटताना पाहून इंग्लंडचे खेळाडू रडकुंडीला आले होते. पण, रिषभ व हार्दिक त्यांच्यावर दयामाया करायला तयार नव्हते.
४ बाद ७२ वरून या दोघांनी १३३ धावांची भागीदारी करताना संघाची धावसंख्या २०५ धावांपर्यंत पोहोचवली, म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावर येऊन बसवले. हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला.एकाच वन डे सामन्यात ५०+ धावा व ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा हार्दिक हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी कृष्णमाचारी श्रीकांत ( वि. न्यूझीलंड, १९८८), सचिन तेंडुलकर ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९८), सौरव गांगुली ( वि. श्रीलंका, १९९९ आणि वि. झिम्बाब्वे, २०००) व युवराज सिंग ( वि. इंग्लंड, २००८ आणि आयर्लंड, २०११) यांनी हा पराक्रम केला आहे.
भारताला विजयासाठी २३ धावांची गरज असताना रिषभ सुसाट सुटला. त्याने डेव्हिड विलीच्या षटकात ४,४,४,४,४,१ अशी फटकेबाजी केली आणि त्यानंतर पुढील षटकात चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून ५ विकेट्स राखून मालिका २-१ अशी खिशात घातली. रिषभ १६ चौकार व २ षटकारांसह १२५ धावांवर नाबाद राहिला.
पाहा रिषभ व हार्दिकच्या अफलातून खेळीचे हायलाईट्स...
Web Title: Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : 26 fours, 2 sixes ! Rishabh Pant - Highlights of Hardik Pandya's Masterclass innings, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.