Rishabh Pant Delhi Capitals Fine, IPL 2024: बुधवारचा दिवस रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एका वाईट स्वप्नासारखा होता. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर सुनील नारायणच्या ८५ धावांच्या तुफानी खेळीमुळे KKRने २० षटकांत २७२ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने केवळ १६६ धावाच केल्या. त्यांना केवळ १७.२ षटकेच खेळता आली आणि त्यांचा १०३ धावांनी दारूण पराभव झाला. आधीच लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला मोठा धक्का बसला.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आता ४ पैकी ३ सामने हरल्याने गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. KKR विरूद्धचा सामना गमावल्यावर बीसीसीआयने त्यांना आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत दंड ठोठावला. यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखल्याने (slow over rate) ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसला. पंतला २४ लाख रुपये, तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना ६ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या २५% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा असे झाल्याने BCCIकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी CSKविरुद्ध पंतला पहिली वेळ म्हणून १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता.
पुन्हा असे झाल्यास सामन्याची बंदी अन् मोठा दंड
रिषभ पंतकडून दोन वेळा षटकांची गती कमी राखण्याची चूक घडली आहे. पुन्हा अशी चूक घडल्यास त्याच्यावर ३० लाखांचा दंड लावला जाईल तसेच त्याला पुढच्या एका सामन्यात खेळण्याची बंदी घालण्यात येईल. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना १२ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या ५०% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येईल.
षटकांच्या गतीबाबतचा नियम काय? (Slow Over Rate Rule)
एखाद्या सामन्यात ठराविक षटके टाकण्यासाठी किती वेळ लागायला हवा, याचा वेळ ठरवून देण्यात आला आहे. ICCच्या नियमानुसार, गोलंदाजी करणाऱ्या संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये एका तासात १५ षटके, वन डे सामन्यात एका तासात १४.२ षटके तर टी२० मध्ये १४.१ षटके टाकणे बंधनकारक असते. त्यापेक्षा कमी षटके एका तासात टाकली गेल्यास त्यासाठी प्रत्येक क्रिकेट संस्था वेगवेगळे दंड ठोठवते.
IPLच्या नियमावली नुसार,
१. षटकांची गती कमी राखण्याची चूक पहिल्यांदा झाली तर गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड केला जातो.
२. पुन्हा दुसऱ्यांदा तशीच चूक झाल्यास गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला २४ लाखांचा दंड केला जातो. त प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना ६ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या २५% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येतो.
३. तिसऱ्यांदा अशी चूक घडल्यास घडल्यास गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला ३० लाखांचा दंड केला जातो आणि त्यापुढच्या एका सामन्यासाठी खेळण्यावर बंदी घातली जाते. तर प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना १२ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या ५०% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येतो. तशीच चूक पुढे होत राहिल्यास, हाच नियम पुन्हा पुन्हा लावला जातो.
Web Title: Rishabh Pant IPL 2024 dc vs kkr highlights Big blow to Delhi Capitals fined 24 lakh rupees may face match ban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.