Rishabh Pant Delhi Capitals Fine, IPL 2024: बुधवारचा दिवस रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एका वाईट स्वप्नासारखा होता. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर सुनील नारायणच्या ८५ धावांच्या तुफानी खेळीमुळे KKRने २० षटकांत २७२ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने केवळ १६६ धावाच केल्या. त्यांना केवळ १७.२ षटकेच खेळता आली आणि त्यांचा १०३ धावांनी दारूण पराभव झाला. आधीच लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला मोठा धक्का बसला.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आता ४ पैकी ३ सामने हरल्याने गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. KKR विरूद्धचा सामना गमावल्यावर बीसीसीआयने त्यांना आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत दंड ठोठावला. यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा षटकांची गती कमी राखल्याने (slow over rate) ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसला. पंतला २४ लाख रुपये, तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना ६ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या २५% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा असे झाल्याने BCCIकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी CSKविरुद्ध पंतला पहिली वेळ म्हणून १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता.
पुन्हा असे झाल्यास सामन्याची बंदी अन् मोठा दंड
रिषभ पंतकडून दोन वेळा षटकांची गती कमी राखण्याची चूक घडली आहे. पुन्हा अशी चूक घडल्यास त्याच्यावर ३० लाखांचा दंड लावला जाईल तसेच त्याला पुढच्या एका सामन्यात खेळण्याची बंदी घालण्यात येईल. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना १२ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या ५०% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येईल.