Rishabh Pant Dhruv Jurel, IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या दिवसाच्या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारताचे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जाडेजा, रवी अश्विन, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान साऱ्यांनीच निराशा केली. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू रिषभ पंत ठरला. त्याने २ चौकारांसह २० धावा केल्या. भारताचा डाव संपल्यावर काही काळ रिषभ पंत किपिंग करताना दिसला. नंतर तो बाहेर गेला आणि ध्रुव जुरेल मैदानात किपिंगला उतरला. कालच्या विश्रांतीनंतर आज रिषभ पंत मैदानात येईल अशी अपेक्षा पण तसे होऊ शकले नाही. आता तर असा अंदाज लावला जातोय की, रिषभ पंत दीर्घकाळासाठी संघाबाहेर होण्याची शक्यता आहे. रिषभ पंतला नक्की झालंय काय, जाणून घेऊया.
ध्रुव जुरेलने बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतची जागा घेतली. दुसऱ्या दिवशी पंतला गुडघ्याचा त्रास झाला. त्यामुळे त्याने सामन्याच्या मध्यातच मैदान सोडले. दुसऱ्या दिवशी पंतच्या जागी ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर पंतचा फिटनेस हा सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरला. तिसऱ्या दिवशीही त्याला मैदानात उतरता आले नाही.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पंतच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले होते की, आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही आणि रिषभलाही कोणतीही जोखीम पत्करायची नाही. त्याला ज्या पायावर लागले त्याच पायाची आधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. असे असूनही पंत तिसऱ्या दिवशी मैदानात उतरेल, अशी आशा कर्णधार रोहितने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केली होती. मात्र तिसऱ्या दिवशी त्याला मैदानात उतरवता न आल्याने पंतबद्दलची चिंता वाढली आहे.
दुखापत कशी झाली?
बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजा गोलंदाजी करत होता. डेव्हॉन कॉनवे स्ट्राइक वर होता. जाडेजाचा चेंडू टाकल्यावर कॉन्वे मिस झाला. पंतला चेंडू नीट पकडता आला नाही, त्यामुळे चेंडू त्याच्या उजव्या गुडघ्याला लागला. पुढच्याच क्षणी पंत जमिनीवर पडून राहिला, त्यामुळे खेळ बराच वेळ थांबला. तेव्हापासून तो मैदानावर आलेला नाही.