Rishabh Pant Health Update: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याला ३० डिसेंबरला आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी घरी जात असताना त्याच्या आलिशान कारला अपघात झाला होता. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. जवळपास दोन आठवड्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अनेक ऑपरेशन्स केल्यानंतर त्याच्या गुडघ्याचीही अतिशय नाजूक व किटकट अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता दोन आठवड्यात रिषभ पंतला रूग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असली तरी पंतला मैदानात उतरण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे.
ऋषभ पंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर 2 महिने पुनर्वसन केंद्रात!
२५ वर्षीय पंतच्या गुडघ्यावर १० दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवले होते. टाईम्स ऑफ इंडिया मधील एका अहवालात असे सूचित केले आहे की अस्थिबंधन नैसर्गिकरित्या बरे होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पंतला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. एकदा अस्थिबंधन (Ligament) बरे झाले की, तो पुनर्वसन केंद्रात जाईल. दोन महिन्यांच्या कालावधीत त्याच्या स्थितीचे पुन्हा मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर चार ते सहा आठवड्यांत तो पुन्हा खेळू शकतो. डॉक्टरांनी सांगितले की एमसीएल शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पंतसाठी पुनरागमनाचा मार्ग खूपच कठीण असू शकतो.
“अस्थिबंध सहसा चार ते सहा आठवड्यांत बरे होतात. त्यानंतर, पुनर्वसन आणि इतर ट्रेनिंग सुरू होईल. त्याच्या खेळातील पुनरागमनासाठी त्याचे मूल्यांकन पुढील दोन महिन्यांत होईल. हा मार्ग खडतर असेल. त्याला समुपदेशन सत्रेही घ्यावी लागणार होती. त्याला खेळायला चार ते सहा महिने लागू शकतात,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पंत, डिसेंबर २०२२ मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकणाऱ्या भारतीय कसोटी संघाचा भाग होता. त्या सामन्यात ऋषभ पंतने मॅचविनिंग खेळी खेळली. तसेच शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरही त्याने ९३ धावांची दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे आता तो लवकरात लवकरात बरा व्हावा याची सारेच प्रार्थना करत आहेत.