नवी दिल्ली : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा वारंवार मिळालेल्या संधी वाया घालवीत असून, नव्या दमाने कामगिरी करण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी, असा सल्ला राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी दिला आहे.
पंत हा मर्यादित षटकांच्या सामन्यात सतत अपयशी ठरला. त्याने या प्रकारात अखेरची अर्धशतकी खेळी फेब्रुवारीत वेस्ट इंडीजविरुद्ध केली होती. २०२२ ला टी-२० त जे २१ डाव खेळले त्यात केवळ दोनदा ३० हून अधिक धावा केल्या होत्या. वन डेत २५ वर्षांच्या ऋषभने यंदा नऊ डावांमध्ये दोन अर्धशतके ठोकली. शिवाय एक शतकी खेळी केली आहे. ‘चिकी विका’या स्वत:च्या यू-ट्यूब चॅनेलवर श्रीकांत म्हणाले, ‘आपण पंतला काही काळ विश्रांती देत प्रतीक्षा कर, असे सांगू शकतो. पुनरागमनानंतर तो राष्ट्रीय संघासाठी फारच उपयुक्त ठरू शकेल. सध्या तरी त्याच्याकडून धावा निघत नाहीत. त्याला वारंवार संधी देऊनही संधी वाया जात आहे. आता अधिक संधी देऊ नये. ऋषभला जितक्या संधी मिळाल्या, त्याचा तो लाभ घेऊ शकला नाही. हे काय चाललेय? मी थोडा निराश आहे.’पंतने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत केवळ १७ धावा काढल्या. त्यानंतर पहिल्या वन डेत तो १५ धावा काढून बाद झाला. याविषयी माजी सलामीवीर श्रीकांत म्हणाले, ‘ऋषभ संधी वाया घालवतो. बलाढ्य संघांविरुद्ध तुम्ही चांगली कामगिरी करीत असाल तर ते हितावह ठरेल.’