Rishabh Pant, IND vs BAN: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. बांगलादेशचा संघ पाकिस्तान विरूद्धची कसोटी मालिका जिंकून भारतात आला होता. भारतात त्यांची तशीच कामगिरी दिसेल अशी चाहत्यांना आशा होती. पण पहिल्या दिवसाच्या सुरुवातीची दोन सत्र वगळता त्यांना सामन्यावर फारशी पकड मिळवता आली नाही. आधी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने शतक ठोकले. तर दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि रिषभ पंत या दोघांनी शतक ठोकले. रिषभ पंतने वेगवान खेळी केल्याने त्याच्याबाबत जास्त चर्चादेखील झाली. तशातच न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर इयन स्मिथने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.
"रिषभ पंत हा एक गुणी खेळाडू आहे. मला त्याचा स्वभाव खूप भावतो. पंतच्या खेळीत एक आक्रमकता दिसून येते. त्यामुळेच तो मैदानावर अधिराज्य गाजवू शकतो. त्याच्याबद्दल मी खात्रीने सांगतो संघ संकटात असेल तर तो कधीही पळून जाणार नाही किंवा उदास होणार नाही. तो परिस्थितीशी झुंज देत संघाला संकटातून नक्की बाहेर काढेल. तुम्ही त्याला सलामीला खेळायला सांगितले तर तो सलामीला खेळेल, त्याला पाचव्या नंबरवर बॅटिंगला पाठवलं तर तो तेथेही चांगला खेळ करेल. तो आताच्या घडीला जगातील सर्वोत्तम विकेटकिपर नसेल, पण तो त्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहे," असे स्मिथ म्हणाला.
"रिषभ पंत हा खूप प्रामाणिक खेळाडू आहे. तो किपिंग करत असताना बराच काळ स्टंपच्या जवळ उभा असतो. खेळपट्टी कशी आहे, कोणाला काय पद्धतीची मदत मिळेल या साऱ्या गोष्टी त्याला स्टंपच्या मागे उभे राहून कळतात. त्याला कोणत्याही परिस्थितीत कुठलीही जबाबदारी दिली तरी तो न घाबरता गोष्टींना सामोरा जातो. त्याच्या याच निर्भिड स्वभावामुळे मला तो अॅडम गिलक्रिस्टची आठवण करून देतो. गिलख्रिस्ट हा दिग्गज आणि प्रतिभावान किपर होता. त्याच्याप्रमाणेच रिषभ पंतदेखील चांगली कामगिरी करेल यात वाद नाही. मी पंतला उच्च दर्जाचा खेळाडू मानतो" अशा शब्दात स्मिथने त्याची स्तुती केली.
दरम्यान, रिषभ पंत पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात फ्लॉप झाला होता. तो ५२ चेंडूत ३९ धावा करू शकला होता. पण दुसऱ्या डावात मात्र त्याने १२८ चेंडूत १०९ धावा केल्या. त्या खेळीत एकूण १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.