भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला झालेल्या अपघातानंतर टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. आतापर्यंत रिषभ केवळ वन डे वर्ल्ड कपच खेळणार नसल्याचे सांगण्यात येत होते, परंतु काही इंग्रजी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिषभला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे. रिषभ पंतवर दुसरी सर्जरी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रिषभच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर तो दोन सेकंद का होईना उभा राहिला होता. त्यामुळे तो लवकर पुनरागमन करेल अशी आशा निर्माण झाली होती. पण, त्याची दुखापत गंभीर असल्याचे वृत्त समोर येतेच आणि त्यामुळे त्याला २०२३ नव्हे, तर २०२४ मध्येही क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
भारतात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी आयपीएल व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलही होईल, परंतु त्यात रिषभ पंत खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पुढच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या काही सामन्यांसह आयपीएल २०२४ व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( जून) स्पर्धेतही रिषभ खेळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. २५ वर्षीय रिषभवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलवर उपचार सुरू आहेत.
पंतच्या दोन लिगामेंटला दुखापत झाली होती. त्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सहा आठवड्यानंतर त्याच्यावर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे यावर्षातील त्याला बहुतांश काळ मैदानाबाहेरच राहावे लागणार आहे. रिषभ पंत हा मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत डॉक्टरांनी निश्चित वेळमर्यादा दिलेली नाही. मात्र बीसीसीआय आणि निवड समितीने रिषभ पंत हा किमान सहा महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील, असा निष्कर्ष काढला आहे.
रिषभ पंतने आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने ९३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. तसेच पहिल्या सामन्यातही त्याने ४६ धावांची आक्रमक खेळी केली होती. ''तो यष्टिरक्षक आहे आणि त्याला सातत्याने शरीराची हालचाल करावी लागते, हे विसरता कामा नये. त्याचा अधिक भार हा गुडघ्यावर असतो. त्यामुळे त्याला मैदानावर उतरवण्याच्या बाबतीत कोणतीच घाई करणार नाही,''असे सूत्रांनी सांगितले.