Rishabh Pant Sunil Gavaskar: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. बंगळुरूमध्ये रविवारी (१९ जून) झालेला शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. संपूर्ण मालिकेत चाहत्यांच्या नजरा कर्णधार रिषभ पंतवर खिळल्या होत्या. पण तो फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही. पंतला ४ डावांत केवळ ५८ धावा करता आल्या. दिनेश कार्तिकचे पुनरागमन आणि इशान किशनच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) रिषभ पंतचे स्थान काहीसे धोक्यात असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पंतच्या खराब कामगिरीमागील कारण आणि टी२० संघातील स्थान याबाबत विधान केले.
रिषभ पंत हा कसोटी संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण टी२०मध्ये त्याची कामगिरी फारशी विशेष झालेली नाही. ४८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंतची सरासरी केवळ २३ची आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पंतबाबत एक वक्तव्य केले. ऋषभ पंतवर टी२० संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही दबाव नसेल असे गावसकर म्हणाले. पण खराब फॉर्म आणि धावांचा तुटवडा याबाबत पंतने विचार करायला हवा असेही ते म्हणाले. पंतचं फलंदाजी करताना शॉट सिलेक्शन म्हणजे फटक्याची निवड करणं चुकतंय, असे ते म्हणाले.
"भारताच्या टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी पंतला झगडावे लागेल असे मला वाटत नाही. आता केवळ सुरुवात आहे. वर्ल्ड कपच्या आधी बरेच टी२० सामने बाकी आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टी२० मालिका आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतेही दडपण असेल असे मला वाटत नाही. तो दबाव घेणारा खेळाडू नाही. मैदानावर जाऊन तो आपल्या क्रिकेटचा आनंद घेतो. या मानसिकतेमुळेच पंतला यश मिळाले आहे. आता मात्र मी वाट पाहीन कारण विश्वचषकापूर्वी तो कसा खेळतो यावर सारं अवलंबून आहे. आपण आपल्या मनाने काहीही ठरवू शकतो पण अंतिम निर्णय निवड समितीवरच असतो", असे गावसकरांनी सांगितले.
Web Title: Rishabh Pant place in Team India for T20 World Cup 2022 in danger or not What is wrong See What Sunil Gavaskar tells IND vs SA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.