Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आणि प्ले-ऑफ्ससाठीच्या आशा जिवंत ठेवल्या. दिल्लीच्या कालच्या विजयामुळे त्यांचा संघ टॉप-४ मध्ये जरी आला नसला तरी त्यांना अपेक्षित दोन गुण मिळवता आले. दिल्लीच्या संघाने यंदाच्या हंगामातील सहाव्या विजयासह ५व्या स्थानी झेप घेतली. आता साखळी फेरीतील उर्वरित दोनही सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास दिल्लीला प्लेऑफ्सचे तिकीट नक्की मिळेल. याच दरम्यान कालच्या सामन्यात दिल्लीच्या विजयासह आणखी एका गोष्टीने चाहत्यांना खुश केले. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने एक महत्त्वाचा टप्पा पार करत महेंद्रसिंग धोनीच्या पंगतीत स्थान मिळवले.
दिल्लीसाठी विजय अपरिहार्य असलेल्या सामन्यात रिषभ पंतने एक विशेष पराक्रम केला. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ४,००० धावांचा टप्पा ओलांडला. रिषभ पंतने केवळ चार चेंडू खेळले आणि त्यात १३ धावा केल्या. पण त्याच्या या छोटेखानी खेळीने त्याने टी२० मध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या. या पराक्रमाच्या जोरावर त्याने एका खास यादीत स्वत:चे स्थान निर्माण केले. टी२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा ओलांडणारे भारतीय विकेटकिपर फलंदाज हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यात त्याने स्थान पटकावलं. या यादीत महेंद्रसिंग धोनी अव्वल आहे. त्याच्या नावावर ३३९ टी२० सामन्यात ६ हजार ५५७ धावा आहेत. पार्थिव पटेल ४ हजार ३०० धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यात आता रिषभ पंतचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाकडून आर अश्विनने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३८ चेंडूत ५० धावा केल्या. त्याशिवाय देवदत्त पडिक्कलने ४८ धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानने दिल्लीला १६१ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मिचेल मार्शने ६२ चेंडूत ८९ धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. अखेर, रिषभ पंतने नाबाद १३ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला.