वेस्ट इंडिजचा फलंदाज रॉवमन पॉवेल याने शुक्रवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात तुफान फटकेबाजी करत ३६ चेंडूत नाबाद ६८ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने जवळपास सामना जिंकलाच होता, पण मोक्याच्या क्षणी फटके न खेळता आल्याने भारताचा ८ धावांनी रोमहर्षक विजय झाला. भारताने सामना जिंकला असला तरी रॉवमन पॉवेलच्या फटकेबाजीची साऱ्यांनाच भुरळ पडली. त्याने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. याबाबत बोलताना ऋषभ पंतने केलेल्या एका विधानामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
ऋषभ पंतने नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्याला सामनावीराचा किताब मिळाला. हा किताब स्वीकारताना त्याला प्रतिक्रिया देण्यास सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, "रॉवमन पॉवेल अक्षरश: बंदुकीतून गोळ्या सुटतात त्या वेगाने चेंडू सीमारेषेवर पाठवत होता. तो जेव्हा आमच्या गोलंदाजांची धुलाई करत होता, त्यावेळी मला मनातूक खरं तर थोडासा आनंद होता. कारण नुकत्याच झालेल्या IPL 2022 Mega Auction मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला विकत घेतलं आहे. त्यामुळे माझ्या संघात असा दमदार खेळाडू मिळाल्यामुळे मी खुश आहे."
IPL 2022 मेगा लिलावात रॉवमन पॉवेलवर दिल्ली कॅपिटल्सने २.८ कोटी रूपयांची बोली लावत त्याला संघात समाविष्ट करून घेतले आहे. या संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. त्यामुळे पंतने तसं वक्तव्य केलं.
दरम्यान, भारतीय संघाने विराट कोहली आणि ऋषभ पंत दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १८०पार मजल मारली. ऋषभ पंतने २८ चेंडूत तुफान फटकेबाजी करत नाबाद ५२ धावा कुटल्या. त्याने ७ चौकार आणि १ षटकार खेचला व संघाला १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर वेस्ट इंडिजकडून पॉवेल आणि पूरन जोडीने शतकी भागीदारी केली होती. पण अखेर त्यांना विजय मिळवता आला नाही. भारताने ८ धावांनी सामना जिंकला.