रिषभ पंतला झालेल्या अपघातामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीहून कारने घरी परतत असताना आज पहाटे रिषभ पंतलाअपघात झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रिषभ पंतच्या डोक्यावर आणि पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका आणि आयपीएलच २०२३ च्या हंगामाला रिषभ पंतला मुकावे लागणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतीत आहेत. तसेच त्याचं पुनरागमन कधी होणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये बॉर्डर-गावस्कर करंडक मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमध्ये खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत गंभीर जखमी झालेला रिषभ पंत तोपर्यंत तंदुरुस्त होणे कठीण आहे. तसेच रिषभ पंतच्या पायाला झालेली गंभीर दुखापत पाहता तो आयपीएल २०२३ च्या हंगामापर्यंत फिट होणेही कठीण आहे. रिषभ पंत हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्याला झालेल्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्सलाही धक्का बसला आहे.
दरम्यान, देहराडूनमधील मॅक्स रुग्णालयाचे डॉक्टर आशिष याज्ञिक यांनी रिषभ पंतच्या आरोग्याबाबत बुलेटिन जारी केले आहे. त्यात त्यांनी रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांची टीम सध्या त्याची पूर्ण तपासणी करत आहे. त्याचा पाय आणि कमरेला दुखापत झाली आहे. त्यावर उपचार केले जात आहेत. रिषभ पंतची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तो बोलू शकतो. आता डॉक्टरांची टीम तपासणी केल्यानंतरच पुढील माहिती देईल.