मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स - दिल्ली कॅपिटल्स सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटच्या क्षणी राजस्थानने १५ धावांनी बाजी मारली. दरम्यान, नो-बॉलच्या वादाला खतपाणी घातल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला सामना शुल्काच्या शंभर टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे.
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला ५० टक्के दंड ठोठावण्यात आला. सहायक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. आमरे यांच्यावर त्यांच्या एका सामन्याच्या शुल्काइतका दंडदेखील ठोठावण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. पंतने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.७ च्या ‘लेव्हल टू’चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य केला. शार्दुलनेही चूक कबूल केली. सामना थांबवण्यासाठी प्रवीण आमरे मैदानात पोहोचले होते. त्यांनीही आरोप मान्य करून शिक्षा स्वीकारली.
पंचांचा निर्णय मान्य करावा लागेलअखेरच्या षटकात मैदानावर जे घडले त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. स्टाफपैकी कुणी मैदानावर जाणे चुकीचे होते. पंचांचा निर्णय बरोबर असो की चूक तो मान्य करावाच लागेल, असे मत दिल्ली कॅपिटल्सचे सहायक कोच शेन वॉटसन यांनी सांगितले.
तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप करायला हवा होता : पंतकंबरेच्या वरून गेलेल्या फुलटॉसवर तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप करून नो बॉल द्यायला हवा होता, असे मत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने व्यक्त केले. तो नो बॉल आमच्यासाठी निर्णायक ठरू शकला असता. नो बॉल आहे की नाही हे पाहणे निर्णायकाचे काम असल्याचे पंतने म्हटले.
धोनीचाही सुटला होता संयमनिर्णायक क्षणी निर्णय विरोधात गेल्यामुळे एरव्ही ‘कॅप्टन कूल’ अशी ख्याती असलेल्या महेंद्रसिंग धोनीचादेखील संयम सुटल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएल २०१९ मध्ये राजस्थानविरुद्ध जयपूर येथील सामन्यात अखेरच्या षटकातील नो बॉल निर्णयावर वाद होताच धोनी मैदानात आला होता. पंचांसोबत त्याने वाद घातला. नंतर धोनीवर सामना शुल्कातील रकमेच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता.