Rishabh Pant Video: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे मैदानात पुनरागमन आता फार दूर नाही. नवीन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही तेच म्हणाल. २०२२ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर दुखापतीतून सावरणाऱ्या ऋषभ पंतने सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विकेटकीपिंग आणि फलंदाजी करताना दिसत आहे. पंत गेल्या एक वर्षाहून अधिक काळ मैदानापासून दूर आहे. चाहतेही त्याच्या मैदानात परतण्याची वाट पाहत आहेत.
ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, '(खेळण्याच्या दृष्टीने) प्रगती करत आहे.' या व्हिडिओमध्ये पंत विकेटकीपिंगचा सराव करताना दिसत आहे. तो फलंदाजी करतानाही दिसत आहे. दुखापत होण्यापूर्वी पंत ज्या शैलीत मैदानावर फटके मारताना दिसला होता, त्याच शैलीत फटके मारताना आताही दिसत आहे. यादरम्यान पंतने कव्हर ड्राईव्ह आणि पुल शॉट्स खेळले. साहजिकच त्याला स्वत: लवकरात लवकर पूर्ण तंदुरुस्त होऊन पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आहे.
दरम्यान, अलीकडेच ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सने अलूर येथे आयोजित केलेल्या सराव सामन्यात भाग घेतला. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट देखील केली होती, ज्यामध्ये तो अलूर क्रिकेट स्टेडियममध्ये दिसला होता. तो IPLमध्येही खेळण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक एका निवेदनात म्हणाले होते, 'तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही फक्त आशा करू शकतो की तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे. तो कदाचित सर्व सामने खेळू शकणार नाही, परंतु जर त्याने १४ पैकी १० लीग सामने खेळले तरीही ते संघासाठी बोनसच ठरेल.