Rishabh Pant, IND vs AUS: टीम इंडियाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. २०१८ मध्ये भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली. या मालिका विजयात भारताच्या युवा खेळाडूंचा मोटा वाटा आणि मोलाचे योगदान होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा मोठा खेळाडू म्हणून सर्वांसमोर आला. त्यावेळी त्याच्या भावना आणि शारीरिक परिस्थिती नक्की कशी होती, याबद्दल नुकताच त्याने अनुभव सांगितला.
रिषभने एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आलेल्या अडचणी शेअर केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात हा त्याच्यासाठी सर्वात कठीण काळ होता, असं तो म्हणाला. त्याने सिडनीच्या मैदानात दुखापतग्रस्त असूनही ९७ धावांची खेळी केली होती. त्याबद्दल त्याने अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.
"दौऱ्याच्या सुरुवातीला खूप अडचणीतून जावे लागले. त्या दौऱ्यापूर्वी मी एकदिवसीय आणि टी२० संघाबाहेर होते, त्याचं मला खूप दुःख होतं. पण संघाबाहेर असताना मी माझा खेळ सुधारण्यावर लक्ष दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला होता. सामन्यादरम्यान कोपराला दुखापत झाली होती, त्यानंतर तो खेळू शकला नाही. त्यामुळे किपिंग करायला वृद्धिमान साहा आला. पण फलंदाजी सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी फलंदाजीसाठी इंजेक्शन घेऊन उतरलो. त्रास होत होता पण त्याकडे दुर्लक्ष करून मी खेळलो कारण माझ्यासाठी संघ महत्त्वाचा होता", असा किस्सा पंतने सांगितला.
दरम्यान, अडलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांत गारद झाल्यानंतर पुढे टीम इंडिया मालिका जिंकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुसऱ्या कसोटीपासून अजिंक्य रहाणे कर्णधार झाला आणि भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला.