मुंबई: विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मानं नेतृत्त्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. सध्या रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचं नेतृत्त्व करत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघानं सलग १२ सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र माजी क्रिकेटपटूनं कसोटी कर्णधारपदासाठी वेगळ्याच खेळाडूचं नाव सुचवलं आहे.
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या खेळात गेल्या काही वर्षांत खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे भविष्यासाठी त्याला कर्णधार म्हणून तयार करायला हवं, असं मत युवराजनं मांडलं. २०१८ मध्ये ऋषभ पंतनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत ३० कसोटीत त्याच्या नावावर १९२० धावा जमा आहेत. त्यात ४ शतकं आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टिरक्षक पंतच्या नावावर १०७ झेल आणि ११ यष्टिचीत आहे.
तुम्ही युवा पंतची निवड करू शकता. तो भविष्यातला कर्णधार होऊ शकतो. त्याला वेळ द्यायला हवा. पहिल्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात त्याच्याकडून उत्तम कामगिरी होईल, अशी आशा करायला नको. चांगल्या कामगिरीसाठी तुम्हाला तरुणांवर विश्वास ठेवायला हवा, असं युवराज म्हणाला. भारतीय संघानं २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यात युवराजची महत्त्वाची भूमिका होती.
ऋषभ पंत अपरिपक्व असल्याची टीका काही जणांकडून केली जाते. त्या टीकेलाही युवराजनं उत्तर दिलं. पंत भविष्यातला कर्णधार होऊ शकतो हे माझं मत आहे. त्याबद्दल सपोर्टिंग स्टाफला काय वाटतं, ते काय विचार करतात, ते मला माहीत नाही. पण कसोटी संघासाठी तो उत्तम कर्णधार ठरेल, असं मला वाटतं, अशा शब्दांत युवराजनं पंतसाठी बॅटिंग केली.