कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिषभ पंतची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दरम्यान, रिषभ पंत एवढ्या रात्री एकटाच दिल्लीहून उत्तराखंडमधील घरी का जात होता यामागचं भावूक कारण समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंत हा आईला सरप्राईज देऊ इच्छित होता. त्यासाठीच तो दिल्लीहून एकटाच निघाला होता. त्या दरम्यान गाडी चालवत असताना अचानक त्याचा डोळा लागला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा पंतसोबत गाडीत कुणीही नव्हते.
रिषभ पंत स्वतः गाडी चालवत रुडकी येथे आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होता. दरम्यान, आता त्याची प्रकृती ठीक आहे. तसेच तो बोलण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्यानेच हा अपघात कसा घडला, याची माहिती दिली आहे. सध्या पंतवर देहराडून येथील मँक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतच्या कारचा नंबर डीएल १० सीएन १७१७ असा होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंतची भरधाव कार रेलिंगवर जाऊन आदळली. त्यानंतर कारला आग लागली. खूप प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. तसेच त्याच्यावरील उपचारांची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. रिषभ पंतच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.