भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने पहिल्या दिवशी स्टेडियममधील चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन केलं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शतकापासून केवळ चार धावा दूर असताना रिषभ पंत बाद झाला. वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने रविंद्र जाडेजाच्या साथीने दमदार खेळी केली. आपल्या अर्धशतकापर्यंत त्याने संयमी खेळ करून दाखवला पण त्यानंतर मात्र त्याने दणका देण्यास सुरूवात केली. पण दुर्दैवाने त्याला शतक करता आले नाही.
कर्णधार रोहित शर्मा (२९), मयंक अग्रवाल (३३), विराट कोहली (४५), श्रेयस अय्यर (२७) हे चार फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. हनुमा विहारीने अर्धशतकी (५८) खेळी केली, पण तोदेखील बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने डावाचा ताबा घेतला. रविंद्र जाडेजाच्या साथीने त्याने धावा केल्या. सुरूवातीला संयमी खेळी करणाऱ्या पंतने नंतर तुफान फटकेबाजी केली. पण ९६ धावांवर असताना तो बाद झाला. स्विंग होणाऱ्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.
ज्या षटकात पंत बाद झाला त्या षटकात आधी त्याला एकदा नशिबाची साथ मिळाली होती. एक चेंडू त्याच्या पायाला लागला त्यावेळी श्रीलंकेकडून अपील करण्यात आलं. DRS मध्ये पंत नाबाद असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर दोन चेंडूच्या अवकाशाने तो क्लीन बोल्ड झाला. पंतचं भारतात हे चौथं शतक हुकलं. याआधी एकदा तो ९१ धावांवर तर दोन वेळा ९२ धावांवर बाद झाला होता.