India vs South Africa Test Series : घरच्या मैदानावर न्यूझीलंडला १-० ने मात दिल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इतिहास रचण्यास सज्ज आहे. २६ डिसेंबरपासून भारत-आफ्रिका यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा हिटमॅन रोहित शर्मा संघात नाहीये. दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली आहे. पण इतर सर्व बडे खेळाडू संघात असून आपला दमदार खेळ दाखवण्यास उत्सुक आहेत. भारतीय संघ अद्याप आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. तो इतिहास पुसण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. त्याचसोबतच भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत यालाही या मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे.
धोनीच्या विक्रम मोडणार का ऋषभ पंत?
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा एक यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक होता. त्याच्या कारकिर्दीत यष्टीमागे उभं राहून त्याने अनेक सामने फिरवले. धोनीचा वारसदार म्हणून सध्या ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. पंतनेदेखील आपल्या खेळात सुधारणा करून चाहत्यांच्या अपेक्षा बहुतांशी पूर्ण केल्या आहेत. तशातच आता पंतकडे आपला आदर्श असलेल्या धोनीचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय संघाकडून यष्टीरक्षण करताना सर्वात जलद १०० गडी बाद करण्यात मदत करणारा भारतीय यष्टीरक्षक होण्याची संधी ऋषभ पंतकडे आहे.
ऋषभ पंतच्या नावे सध्या यष्टीरक्षण करताना ९७ बळी आहेत. त्यापैकी ८९ झेल आहेत तर ८ स्टंपिंग आहेत. आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना हा पंतचा २६ वा कसोटी सामना आहे. या सामन्यात जर ऋषभ पंतने यष्टीरक्षण करताना आणखी तीन बळी मिळवले तर त्याचे बळींचे शतक पूर्ण होईल. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद बळींचे शतक पूर्ण करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने ३६ व्या कसोटी सामन्यात ही किमया केली होती. पण पंतला २६ व्या सामन्यातच ही संधी मिळणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद बळींचे शतक पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत सध्या तरी धोनी (३६ सामने) अव्वल आहे. त्यापाठोपाठ वृद्धिमान साहा दुसरा (३७), किरण मोरे तिसरा (३९), नयन मोंगिया चौथा (४१) आणि सय्यद किरमाणी पाचव्या स्थानी (४२) आहेत.