Rishabh Pant: भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर तो दिवस आला, ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ऋषभ पंत कुठल्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर चालायला लागला आहे. स्वतः ऋषभ पंतने त्याच्या एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो मदतीशिवाय आरामात चालताना दिसत आहे.
पंत कधी बरा होणार, हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात होता. त्याचे उत्तर आता चाहत्यांना मिळाले आहे. ऋषभ हळुहळू बरा हो आहे. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीचा सामना पाहण्यासाठी मैदानात आला होता. त्यानंतर आता त्याने कुठल्याही आधाराशिवाय चालणे सुरू केले आहे. पंतने त्याच्या व्हिडिओमध्ये केजीएफ चित्रपटाचे संगीत वापरले आहे.
व्हिडिओत तो आधी काठी(क्रॅच) हातात घेऊन उभा असल्याचे दिसत आहे, नंतर अचानक तो क्रॅच फेकून देतो आणि आधाराशिवाय चालायला लागतो. ऋषभ पंतचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी लाइक केला आहे, तर टीम इंडियाच्या खेळाडूंनीही या गुड न्यूजवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. तेथे बीसीसीआयचे सर्वोत्कृष्ट फिजिओ आणि प्रशिक्षक त्याला लवकरात लवकर तंदुरुस्त करत आहेत.
ऋषभ पंत ज्या वेगाने बरा होत आहे, ते पाहून चाहत्यांच्या मनात एक प्रश्न येत आहे की, तो येणाऱ्या वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल का? वर्ल्ड कप या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतातच खेळवला जाणार आहे. ऋषभ पंतची रिकव्हरी ज्या वेगाने होत आहे, ते पाहता एक आशा निर्माण होत आहे.