भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत धूळ चारल्यानंतर भारताच्या सर्व खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ब्रिस्बेन कसोटीत मैदानात टिच्चून फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेल्या यष्टीरक्षक रिषभ पंतवरही सर्वजण खूश आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला जशासतसं प्रत्युत्तर देण्याचीही धमक रिषभ पंत ठेवतो. रिषभचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
रिषभ स्टम्पच्या मागे एक गाणं गात होता आणि त्याचा आवाज स्टम्पला असलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाला. भारताचा यष्टीरक्षक पंत स्टम्पच्या मागे चक्क 'स्पायडरमॅन स्पायडरमॅन' गाणं गुणगुणत होता.
अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी
रिषभच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियामध्ये कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्याचं झालं असं की, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन फलंदाजी करत होता आणि भारताच्या फलंदाजीवेळी टीम पेननं त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार स्लेजिंगनं भारतीय फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. मग काय, रिषभनंही पेनला जशासतसं उत्तर द्यायचं ठरवलं आणि तो फलंदाजी करत असताना रिषभनंही गाणं गुणगुणण्यास सुरुवात केली. "ऐसे वेब फेको वेब, ऐसे करके फिस फिस, स्पायडरमॅन...स्पायडरमॅन तुने चुराया मेरे दिलका चेन, क्यू भाईं", असं रिषभ स्टम्पच्या मागे गुणगुणत होता.
ब्रिस्बेनमध्ये रिषभ सामना जिंकूनच माघारी परतला ब्रिस्बेन कसोटी भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची कसोटी होती. कारण या कसोटीत विजय प्राप्त करता आला तर इतिहास रचला जाईल याची कल्पना भारतीय खेळाडूंना होतीच. भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवरची गेल्या ३२ वर्षांची अपराजित राहण्याची परंपरा मोडीत काढली. यात रिषभ पंतचं मोठं योगदान आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी रिषभने खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करत नाबाद ८९ धावांची खेळी साकारली आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला.