मुंबई : आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासाठी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने सांगितले. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
हेडनने एका कार्यक्रमात सांगितले की, ‘ऋषभ पंतसारख्या खेळाडूंमध्ये विजय मिळवण्याची भूक आहे आणि त्याची स्मृती शानदार आहे. गेल्यावेळी जेव्हा तो ऑस्ट्रेलियामध्ये खेळला, तेव्हा तो महत्त्वाचा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनाही त्याचा खेळ खूप आवडला. पंतचा खेळ रोमांचक आणि शानदार होता. शिवाय भारताकडे विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडूही आहेत, जे पुन्हा एकदा छाप पाडण्याचा प्रयत्न करतील. फलंदाजीच्या दृष्टीने माझी उत्सुकता आहे की, भारत ऑस्ट्रेलियात खेळताना कोणत्या रणनीतीचा अवलंब करणार.’
२०२२ सालच्या भीषण रस्ते अपघातातून सावरल्यानंतर पंतने यंदाच्या आयपीएलद्वारे जबरदस्त पुनरागमन केले. त्याने २०२०-२१ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयामध्ये मोलाचे योगदान दिले होते. त्या मालिकेत अनेक प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती राहिल्यानंतरही भारतीयांनी सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमविण्याचा पराक्रम केला होता.
‘ती द्वितीय श्रेणीची गोलंदाजी होती’ मॅथ्यू हेडनने भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या विजयाबद्दल सांगितले की, ‘भारतासाठी मागील मालिका विजय शानदार ठरला. कारण, त्यावेळी हा संघ विराट कोहलीविना खेळला होता. गाबामध्ये ज्या संघाने विजय मिळवलेला, त्या संघाची गोलंदाजी द्वितीय श्रेणीची होती. त्यावेळी असलेला आत्मविश्वास विद्यमान भारतीय संघातही नक्कीच असणार. कारण, त्यांनी याआधीही ऑस्ट्रेलियात विजय मिळवलेला आहे आणि तेही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये, जे खूप मोठे यश आहे.’