चंडीगड : कार अपघातात जखमी झाल्यामुळे जवळपास १५ महिन्यांनंतर क्रिकेट मैदानावर परतलेला यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत हा लवकरच जन्या फॉर्ममध्ये परत येईल, असा विश्वास भारताचे माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी व्यक्त केला. पंत यंदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करीत आहे.
शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध पहिल्या सामन्यात मात्र पंत केवळ १८ धावा काढू शकला. खेळपट्टीवर धाव घेताना मात्र तो जोमात दिसत होता. ऋषभने यष्टीमागे एक झेल टिपला शिवाय एका फलंदाजाला त्याने यष्टिचितही केले. सिद्धू म्हणाले, ‘पंतकडे पाहून मी सांगू शकतो की तो लवकरच फॉर्ममध्ये परत येईल. थोडा वेळ लागणार आहे पण भारतीय क्रिकेटला अनुभवी खेळाडू परत मिळाला आहे. तो मैदानावर परतला यासाठी मी ईश्वराचा आभारी आहे.
कार अपघाताचे फोटो पाहिले की विश्वास बसत नाही. कार जळून खाक झाली होती. त्या भीषण अपघातातून तो बचावला हे आश्चर्यच म्हणावे लागेल. ऋषभवर शस्त्रक्रिया यशस्वी होणार की नाही, याबद्दल चिंता होती, मात्र त्याच्यासाठी सर्वकाही चांगल्याप्रकारे जुळून आले.’