मुंबई : रिषभ पंतची भारताच्या कसोटी संघातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मात्र पंतने भारताचे माजी निवड समिती सदस्यांचा दरवाजा ठोठावल्याचे वृत्त आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतही पंत नापास झाला आणि त्याचा संघातून पत्ता कापण्यात आला. पंतला सध्या सुरु असलेल्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. विश्वचषकात पंतला चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यावेळीही तो नापास झाला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याला संधी दिली, पण पुन्हा एकदा त्याला यश मिळवता आले नाही. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे.
संघातून बारे काढल्यावर पंतने थेट माजी निवड समिती सदस्याचा दरवाजा ठोठावला आहे. पण हे करून त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, हे मात्र काही जणांना समजलेले नाही. पंत नेमका कोणाला भेटला, हे तुम्हाला माहिती नसेल.
पंतने संघातून बाहेर पडल्यावर थेट माजी निवड समिती सदस्य आणि यष्टीरक्षक किरण मोरे यांची भेट घेतली आहे. पंत आता मोरे यांच्याकडून यष्टीरक्षणाचे धडे घेत असल्याचे समजत आहे.
याबाबत किरण मोरे म्हणाले की, " संघातून बाहेर पडल्यावर पंत माझ्याकडे आला असून त्याच्यामधील काही उणीवांवर आम्ही काम करत आहोत. काही गोष्टी फार छोट्या असतात, पण त्यांचे मोठे परीणाम पाहायला मिळतात. त्यामुळे आम्ही सध्या छोट्या गोष्टींवर काम करत आहोत."