मुंबई - अपघातात गंभीर जखमी झालेला भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात होणार आहेत. रुग्णालयातील स्पोर्ट्स मेडिसिन अँड ऑर्थोस्कोपी हेड डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीखाली रिषभ पंतवर उपचार होणार आहेत, असे बीसीसीआयने सांगितले आहे.
दिनशॉ पारदीवाला यांनी याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अष्टपैलू युवराज सिंग आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यावर उपचार केले होते. तसेच रवींद्र जडेजासह काही ऑलिम्पिक खेळाडूंवरही उपचार केले आहेत. आता मुंबईमध्ये रिषभ पंतवर लिगामेंट टियरची सर्जरी होईल. तसेच त्यानंतरचीही प्रक्रियाही इथेच होईल.
दरम्यान, २५ वर्षीय रिषभ पंतला देहराडून येथील एका रुग्णालयातून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले आहे. येथे त्याचा गुडघा आणि पायाच्या घोट्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर व्यापक उपचार होईल. ३० डिसेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, काही दिवस देडराडून येथे उपचार झाल्यानंतर रिषभ पंतला उपचारांसाठी मुंबईत आणण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. रिषभ पंतला सामान्य विमानातून आणता येणे शक्य नसल्याने बीसीसीआयने त्याला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणले.
३० डिसेंबर रोजी पहाटे दिल्लीहून रुडकी येथील घरी जात असताना रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकावर आदळून कारने पेट घेतला होता. सुदैवाने आग लागण्यापूर्वी पंत कारमधून बाहेर आल्याने तो बचावला होता. मात्र त्याचा गुडघ्याला आणि पायाच्या गोट्याला गंभीर दुखापत झाली होती.