दुबई : सिडनी कसोटीत खणखणीत शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आणखी एक पराक्रम नावावर केला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने 21व्या स्थानावर झेप घेतली. सिडनी कसोटीतील शतकामुळे पंतने 17 स्थानांची गरूड भरारी घेतली. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद 159 धावा केल्या होत्या. त्याने या कामगिरीसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व माजी यष्टिरक्षक फारूख इंजीनियर यांना मागे टाकले.
सिडनी कसोटीतील आणखी एक शतकवीर चेतेश्वर पुजाराने एक स्थान वर सरकताना तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( 922), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( 897) आणि पुजारा ( 881) हे अव्वल तीन फलंदाजांत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने सात स्थानांच्या सुधारणेसह 10व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गोलंदाजांनमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन 13 व्या स्थानी आला आहे. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमरा 16व्या स्थानी कायम आहे, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे 1 व 7 स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत 22 वे 45 वे स्थान पटकावले आहे. पंतने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दोन शतकांसह जवळपास 700 धावा केल्या आहेत. पंतच्या खात्यात 673 गुण जमा झाले असून त्याने धोनी आणि फारूख इंजीनियर यांनाही गुणांच्या बाबतित मागे टाकले आहे. धोनीने कारकिर्दीत सर्वोत्तम 662, तर इंजीनियर यांनी 619 गुणांची कमाई केली होती. त्याशिवाय इंजीनियर यांनी 1973 मध्ये कसोटी क्रमवारीत 21 वे स्थान पटकावले होते.