अहमदाबाद : ऋषभ पंतचे आकर्षक शतक व वॉशिंग्टन सुंदरसोबत त्याची शतकी भागीदारी याच्या जोरवर भारताने शुक्रवारी येथे चौथ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर आपले पारडे वरचढ राखले. पंतने १०१ धावा केल्या आणि सुंदरसोबत (नाबाद ६०) सातव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी पहिल्या डावात ७ बाद २९४ धावांची मजल मारली होती.या भागीदारीपूर्वी भारतीय संघ एकवेळ इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करीत होता, पण आता मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या फिरकीपटूला अनुकूल खेळपट्टीवर ८९धावांची आघाडी घेत यजमान संघ मजबूत स्थितीत आहे.भारताचे आघाडीचे तीन फलंदाज चेतेश्वर पुजारा (१७), कर्णधार विराट कोहली (०) आणि अजिंक्य रहाणे (२७) सकाळच्या पहिल्या सत्रात बाद झाले होते, तर रोहित शर्मा (४९) अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला असताना पंत व सुंदर यांनी शतकी भागीदारी करीत डाव सावरला.इंग्लंडने ८० षटके पूर्ण झाल्यानंतर दुसरा नवा चेंडू घेतला आणि पंत कदाचित त्याचीच प्रतीक्षा करीत होता, असे दिसले. त्याने जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकत आनंद साजरा केला. याच गोलंदाजाविरुद्ध त्याने पुढील षट्कार रिव्हर्स स्विपचा फटका मारत जोखीम स्वीकारण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. या युवा यष्टिरक्षक फलंदाजाने रुटच्या गोलंदाजीवर षट्कार ठोकत आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले, पण त्यानंतर लगेच अँडरसनच्या गोलंदाजीवर तो मिडविकेटला झेल देत माघारी परतला.त्यानंतर सुंदरने दिवसअखेर अर्धशतक पूर्ण केले. सुंदर शनिवारी अक्षर पटेलच्या साथीने भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
तिसऱ्या सत्रासह दुसऱ्या दिवसावर भारताचे वर्चस्वपंत व सुंदर यांनी केवळ तिसरे सत्रच नव्हे, तर दुसरा दिवस भारताच्या नावावर केला. तिसऱ्या सत्रात भारताने १४१ धावा केल्या व केवळ एक विकेट गमावली. पंतने ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षट्कार लगावले. त्याने पहिल्या ५० धावा ८२ चेंडूंत तर त्यानंतर शतक ३३ चेंडूत पूर्ण केले.
संयमी खेळी करणारा रोहित शर्मा बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचितचा बळी ठरला. त्याने या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा अवलंब केला, पण तिसऱ्या पंचांनी त्याला अम्पायर्स कॉलच्या आधारावर बाद ठरविले. रोहितला नाबाद द्यायला हवे होते, असे भारताचे माजी क्रिकेटपटू आकाशा चोप्रा यांनी म्हटले आहे, तर चाहत्यांनी आयसीसीने अम्पायर्स कॉल नियमाकडे लक्ष घालावे, असे मत व्यक्त केले. ४९ धावांच्या खेळीदरम्यान रोहित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला सलामीवीर फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे डब्ल्ययूटीसीमध्ये अजिंक्य रहाणेनंतर एक हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
धावफलक
इंंग्लंड पहिला डाव :- २०५.भारत पहिला डाव :- शुभमन गिल पायचित गो. अँडरसन ००, रोहित शर्मा पायचित गो. स्टोक्स ४९, चेतेश्वर पुजारा पायचित गो. लीच १७, विराट कोहली झे. फोक्स गो. स्टोक्स ००, अजिंक्य रहाणे झे. स्टोक्स गो. अँडरसन २७, ऋषभ पंत झे. रुट गो. अँडरसन १०१, रविचंद्रन अश्विन झे. पोप गो. लीच १३, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ६०, अक्षर पटेल खेळत आहे ११. अवांतर (१६). एकूण ९४ षटकांत ७ बाद २९४. बाद क्रम : १-०, २-४०, ३-४१, ४-८०, ५-१२१, ६-१४६, ७-२५९. गोलंदाजी : जेम्स अँडरसन २०-११-४०-३, बेन स्टोक्स २२-६-७३-२, जॅक लीच २३-५-६६-२, डॉम बेस १५-१-५६-०, ज्यो रुट १४-१-४६-०.