बॉलिवूडला सलग दोन धक्के सहन करावे लागले आहेत. बुधवारी हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याने जगाचा निरोप घेतल्यानंतर आज दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धडकली. बुधवारी रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ऋषी कपूर यांना महान फलंदाज सचिन तेंडुलकरसह क्रीडा क्षेत्रातील अऩेकांनी श्रद्धांजील वाहिली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ट्विट केली. तो गेला...ऋषी कपूर गेलेत... मी तुटलोय... , असे ट्विट त्यांनी केले. कपूर कुटुंबातून अभिनेते रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.
ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करताना सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की,''ऋषी जी यांच्या निधनाची बातमी ऐकून खुप दुःख झाले. त्यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो. नेहमी प्रसन्न आणि आनंददायक राहाणारी व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो... या दुःखाच्या काळात नीतू जी, रणबीर आणि कपूर कुटुंबासोबत आहोत.''
''हे काल्पनिक आणि आश्चर्यकारक आहे.. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर जी... असा दिग्गज कलाकार आपल्यातून गेला, ही गोष्ट स्वीकारणे अवघड आहे,'' असे विराट कोहली म्हणाला.
एकापेक्षा एक हिट सिनेमे..१९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. नमस्ते लंडन, औरंगझेब, हाउसफुल्ल 2, स्टूडेंट आॅफ द ईयर, अग्निपथ अशा व अशाच अनेक हिट सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.