महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) २०२१ हे वर्ष गाजवतोय. इंडियन प्रीमिअर लीग, सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धा आणि आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ऋतुराजची बॅट चांगलीच तळपताना पाहायला मिळतेय. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीनं महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विश्वास जिंकला आहे. त्यामुळेच फॅफ ड्यू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो ही तगडी नावं बाजूला ठेऊन चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) IPL 2022 साली ऋतुराजला आपल्या ताफ्यात कायम राखले. भविष्यातील गुंतवणूक म्हणून ऋतुराजकडे CSK फ्रँचायझी पाहत आहे. याच ऋतुराजनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यालाही कडवी टक्कर दिली आहे.
बाबर आजमची तुलना सातत्यानं टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्याशी होत आलीय. पण, विराट सोडा इथे ऋतुराजचच बाबरवर भारी पडताना पाहयला मिळतोय. मैदानावरील कामगिरीवरच फ्रँचायझी लीगमध्ये खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळेच ऋतुराज हा आजच्या घडीला बाबर आजमपेक्षा दुप्पटीनं कमावतोय.
ऋतुराज गायकवाडची २०२१मधील कामगिरी
- आयपीएल - १६ डाव, ६३५ धावा, ४५.३६ सरासरी, १३६.२७ स्ट्राईक रेट, ४ अर्धशतकं, १ शतक
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी - ४ डाव, २५६ धावा, ६४ सरासरी, १५५.१५ स्ट्राईक रेट, ३ अर्धशतकं
- विजय हजारे ट्रॉफी - ३ डाव, ४१४ धावा, २०७ सरासरी, ३ शतकं.
२४ वर्षीय ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीत सलग चौथ्या सामन्यात शतक झळकावल्यास तो कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल व पृथ्वी शॉ यांच्या पंक्तित स्थान पटकावेल. यापैकी फक्त पडिक्कलनं विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात सलग चार शतकं झळकावली आहेत.
चेन्नई सुपर किंग्सनं IPL 2022साठी रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली व ऋतुराज यांना कायम राखले. जडेजासाठी फ्रँचायझीनं सर्वाधिक १६ कोटी मोजले. त्यापाठोपाठ धोनी १२ कोटी, अली ८ कोटी व ऋतुराज ६ कोटी अशी विभागणी झाली. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये कमाईच्या बाबतीत ऋतुराजनं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला मागे टाकले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या बाबरला ३ कोटी इतके मानधन मिळते. ऋतुराज त्याच्यापेक्षा दुप्पट कमावतो.