Join us  

IPL 2020 त ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा सत्कार!

ऋतुराजनं ६ सामन्यांत २०४ धावा केल्या. त्यानं सलग तीन अर्धशतकं झळकावली आणि CSKकडून हा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 06, 2020 4:43 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) यंदाची Indian Premier League (IPL 2020) काही चांगली राहिली नाही. IPLच्या इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. धोनीची बॅटही यंदाच्या लीगमध्ये थंडावलेली पाहायला मिळाली. फॅफ ड्यू प्लेसिस, सॅम कुरन, रवींद्र जडेजा व ऋतुराज गायकवाड वगळता CSKच्या बहुतांश खेळाडूंनी निराशच केले. त्यामुळे IPL 2021साठी संघात बरेच बदल केले जातील, असे संकेत फ्रँचायझीनं दिले होते. यंदाच्या लीगमध्ये अखेरच्या तीन सामन्यांत मॅच विनिंग कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडनं सर्वांचे लक्ष वेधले. 

ऋतुराजनं ६ सामन्यांत २०४ धावा केल्या. त्यानं सलग तीन अर्धशतकं झळकावली आणि CSKकडून हा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी ऋतुराजचा घरी जाऊन सत्कार केला. 'तू क्रिकेटमध्ये घेत असलेले कष्ट पाहून तुझा अभिमान वाटतो. तुला या खेळामध्ये मोठे यश प्राप्त व्हावे. अशाच पद्धतीने तू पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवावे,’ अशा शब्दांत जगताप यांनी ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऋतुराज आपल्या आई-वडिलांसह जुनी सांगवीमध्ये वास्तव्याला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन झाले आहे. 

ऋतुराजची कामगिरी

गायकवाडनं 2016-17च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण केलं. त्याच वर्षी त्यानं आतंरराज्य ट्वेंटी-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं. ऑक्टोबर 2018मध्ये त्याला भारत ब संघाकडून देवधर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ACC एमर्जिंग टीम आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. डिसेंबर 2018मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात त्यानं नाबाद 187 धावा चोपल्या होत्या. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 सामन्यांत 1193 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20त त्यानं 28 सान्यांत 843 धावा चोपल्या आहेत. नाबाद 82 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सपुणे