नवी दिल्ली : भारतीय निवडकर्त्यांसाठी आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी एकदिवसीय संघात सलामीचा फलंदाज शिखर धवनचा हजारे चषकातील खराब फॉर्म हा चिंतेचा विषय असू शकतो. मात्र युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांची संघात निवड होणे जवळपास निश्चित आहे. जानेवारीत होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अद्याप बीसीसीआयने आधीच संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे. मात्र संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.निवडकर्ते ५० षटकांच्या प्रारूपात बायोबबल आणि खेळाडूंचा कार्यभार पाहता कुणाला संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विजय हजारे चषकात गायकवाड आणि अय्यर यांनी अनुक्रमे तीन आणि दोन शतके केली आहेत. अय्यर याने या दरम्यान काही बळीदेखील घेतले. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, तो संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला मागे टाकण्यास तयार आहे. असे मानले जात आहे की, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत सलामीचा फलंदाज म्हणून अय्यरला संघात जागा मिळणे कठीण आहे. तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, व्यंकटेश नक्कीच दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. तो प्रत्येक सामन्यात ९ ते १० षटके गोलंदाजी करत आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत त्याला संधी देण्याची चांगली वेळ आहे.’ महाराष्ट्र संघाचा कर्णधार गायकवाड याने आयपीएलमधील शानदार लय कायम ठेवली आणि निवड समितीसमोर प्रश्न उभा केला आहे. गायकवाड याने श्रीलंकेत दोन टी-२० सामने खेळले आहेत. मात्र त्याला वनडेत संधी मिळालेली नाही. न्यूझीलंडविरोधातदेखील त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती. कारण रोहित सलामीला होता आणि राहुल किंवा इशान किशन हे सलामीला होते. गायकवाड याने सलग तीन सामन्यात मध्य प्रदेशविरोधात १३६, छत्तीसगडविरोधात नाबाद १५४, केरळ विरोधात १२४ धावांची खेळी केली आहे. याकडे निवड समितीला दुर्लक्ष करता येणार नाही, तर दुसरीकडे धवन या दरम्यान ०, १२, १४ आणि १८ धावांवर बाद झाला आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ज्याप्रमाणे कसोटी सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांना संधी दिली आहे. त्यामुळे शिखरला एक संधी मिळू शकते. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, गेल्या वेळी जेव्हा भारत वनडेमध्ये खेळला होता, तेव्हा धवन भारताचे नेतृत्व करत होता आणि त्याने श्रीलंकेविरोधात सामना जिंकून देणारी खेळीदेखील केली होती. त्याच्याकडे लय मिळवण्याची चांगली संधी आहे.