Join us  

प्रतिस्पर्धी संघांनी घेतला धडाकेबाज आंद्रे रसेलचा धसका

हर्षा भोगले लिहितात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:16 AM

Open in App

चिदंबरम स्टेडियमच्या संथ खेळपट्टीच्या तुलनेत केकेआर संघ घरच्या इडन गार्डनच्या खेळपट्टीवर खेळताना सकारात्मक असेल. येथे चेंडू बॅटवर अलगद येतो. याउलट चेन्नईत खेळ पुढे सरकत असताना फलंदाजांची डोकेदुखी वाढते. केकेआरला आठवडाभरापासून प्रवास करावा लागला नसल्याने खेळाडूंना पुरशी विश्रांतीदेखील मिळाली आहे.

केकेआरचे फलंदाज इडनवर खेळणे पसंत करतात. गोलंदाज मात्र खेळपट्टीच्या स्वरूपावर काहीसे साशंक आहेत, तरीही संघ या मैदानावर चांगलाच खेळतो. केकेआरने इडनला ‘गड’ बनवून पुढील तिन्ही सामने जिंकले तर संघाची ‘प्ले आॅफ’ची वाट मोकळी होऊ शकेल. पण त्यासाठी आंद्रे रसेल याला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. चेन्नईत तो विव्हळताना दिसला. त्याआधीही तो जखमी झाला. त्यांच्याकडे आणखी चांगले खेळाडू आहेत, तरीही प्रतिस्पर्धी संघांनी रसेलचा धसका घेतला आहे.

प्रतिस्पर्धी दिल्ली कॅपिटल्सही कोटलाच्या संथ खेळपट्टीच्या तुलनेत इडनच्या खेळपट्टीवर खेळण्यास पसंती दर्शविणार, हे विशेष. सोबतच रबाडा, ईशांत, मॉरिस व बोल्ट यांच्या उपस्थितीने दिल्लीची गोलंदाजी केकेआरच्या तुलनेत भक्कम मानली जाते. रबाडाला गोलंदाजी करताना पाहणे आवडते. तो स्वत: युवा असला तरी वेगवान माऱ्याचे नेतृत्व कसे करायचे, हे त्याला अवगत आहे. बेंगळुरू येथे उत्कृष्ट फॉर्ममध्ये जाणवलेल्या श्रेयसकडून पुन्हा उत्कृष्ट खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीने म्हटल्यानुसार आयपीएलची कामगिरी संघ निवडीत विचारात घेण्यात येणार नसली तरी, श्रेयसची आणखी एक दमदार खेळी त्याला संधी मिळवून देण्यात लाभदायी ठरू शकेल.पंच आणि सामनाधिकारी सामना निर्धारित वेळेत संपविण्यासाठी काय पावले उचलतील, हे पाहणे माझ्यासाठी आवश्यक झाले आहे.

टॅग्स :आयपीएल 2019