Riyan Parag Harshal Patel Fight Controversy: IPL 2022 मध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडल्या. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांसारख्या फारशा चर्चेत नसलेल्या टीम यंदा प्ले-ऑफपर्यंत पोहोचल्या. राजस्थानच्या संघाने थेट उपविजेतेपद मिळवलं. तर बंगलोरचा संघ क्वालिफायर-२ मध्ये घरी परतला. स्पर्धेत २-२ गुणांसाठी आणि १-१ धावेसाठी प्रचंड काँटे की टक्कर होती. त्यामुळे प्रत्येक सामना हा हायव्होल्टेज ड्रामा असायचा. तसाच एक साखळी फेरीचा सामना राजस्थान आणि बंगलोर यांच्यात रंगला. त्यावेळी पहिल्या डावाच्या शेवटी रियान पराग आणि हर्षल पटेल यांच्यात यांच्या जुंपलेली पाहायला मिळाली. पण या मागे खरी चूक या दोघांची नसून मोहम्मद सिराजची होती, असं एक सत्य समोर आलं.
रियान परागने नुकतंच या प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, " मी गेल्या वर्षी हर्षल पटेलच्या RCB विरूद्ध खेळत होतो. त्यावेळी त्याने मला बाद केलं होतं आणि मी परत जात असताना 'घरी जा' अशी अँक्शन केली होती. मला तेव्हा ते कळलं नाही. पण नंतर रिप्ले पाहताना टिव्हीवर मला ते दिसलं. तेव्हापासून माझ्या डोक्यात ती गोष्ट होती. यंदा जेव्हा हर्षल पटेल शेवटची ओव्हर टाकत होता, त्यावेळी मी त्याला सिक्सर मारले आणि त्यावेळी मी तीच अँक्शन त्याला करून दाखवली. ते पाहून सिराज मला आवेशात म्हणाला 'इकडे ये..', मी जेव्हा त्याच्याजवळ गेलो तेव्हा सिराज म्हणाला की, तू अजून लहान मुलगा आहेस.. लहान मुलासारखाच राहा (मोठा व्हायला जाऊ नको). त्यावर मी सिराजला म्हटलं की 'भैय्या, तुम्हाला मी काहीच बोललेलो नाही.' पण त्यानंतर काय घडलं मला माहिती नाही. पण सामन्यानंतर हर्षल पटेलने माझ्याशी शेकहँड केलं नाही. मला त्याचं वागणं विचित्र वाटलं पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही", असा संपूर्ण प्रकार रियान परागने स्पष्ट केला.
दरम्यान, साखळी फेरीत हा प्रकार घडल्यानंतर प्ले-ऑफच्या मोठ्या सामन्यात राजस्थान आणि बंगलोर सेमीफायनलच्या लढतीत एकमेकांसमोर आले. या सामन्यात जोस बटलरने तुफानी शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. त्यात हर्षल पटेलने ३.१ षटकात २९ धावा दिल्या. तर सिराजने २ षटकात ३१ धावा बहाल केल्या. राजस्थान कडून रियान परागला बॅटिंगलाच यावं लागलं नाही. बटलरने त्याआधीच सामना संपवून टाकला.