नवी दिल्ली : क्रिकेट वर्तुळात मंकडिंगच्या शब्दाची खूप चर्चा रंगली आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने इंग्लिश कर्णधार जोस बटलरला मंकडिंग करून धावबाद करण्याचा इशारा दिला होता. याशिवाय आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी एका पत्रकाराने सर्व कर्णधारांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारले होते. खरं तर मंकडिंगच्या मुद्द्यावरून क्रिकेट विश्वात दोन गट पडले आहेत. मंकडिंगवर प्रत्येकाचे मत वेगळे आहे आणि आता राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागनेही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय महिला संघाची गोलंदाज दीप्ती शर्माने केलेल्या मंकडिंगनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
रियान परागने दिला इशारा
दरम्यान, रियान परागने आयपीएल २०२३ पूर्वी सर्व फलंदाजांना इशारा दिला होता की मंकडिंग धावबाद करण्याच्या बाजूनेच आहे. रियानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्याने लिहिले, "मी पुढच्या वर्षी एखाद्याला मंकडिंग करून धावबाद करणार आहे आणि यामुळे ट्विटरवर एक मजेदार वाद निर्माण होणार आहे." रियान परागच्या या ट्विटची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
एकीकडे रियान परागने मंकडिंगबाबत आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे. तर दुसरीकडे अनेक खेळाडू मंकडिंगबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळताना दिसत आहेत. कोणत्याही फलंदाजाला अशा प्रकारे धावबाद करू नये, असे बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मत आहे. तर यापूर्वी देखील अनेक गोलंदाजांनी मंकडिंग करण्याचा इशारा दिला आहे. रियान परागच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, या युवा खेळाडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ४७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर एकूण ५२२ धावांची नोंद आहे. २० वर्षीय रियान शानदार गोलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ४ बळी पटकावले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १५३ धावा करू शकला. इंग्लिंश संघाला विजयासाठी ४० चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती आणि इंग्लंडचे ९ बळी गेले होते. तेवढ्यात सामन्याला एक वेगळे वळण आले, दीप्ती शर्मा गोलंदाजीसाठी आली आणि तिने मंकडिंग पद्धतीने चार्ली डीनला बाद केले. यावरून आजतागायत वाद सुरू आहे. दीप्ती शर्माने केलेल्या मंकडिंगनंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे.
Web Title: Riyan Parag has said that I will also do mankading next year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.